*रमाई*
रमाई म्हणजे साधे पण अत्यत हुशार आणि दयाळु व्यक्तिमत्व. त्यांना 'रमाई' किंवा 'रमा आई' असेही संबोधले जाते. 7 फेब्रुवारी 1897 रोजी वंदनगाव येथे भिकू धात्रे आणि रुक्मिणी यांच्या पोटी जन्म झाला . आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच आई-वडीलांना गमावल्यामुळे गौराबाई, आणि शंकर या त्यांच्या भावंडांसह त्यांचे पालनपोषण त्यांच्या काकांनी मुंबईत केले.
रमाईचे वयाच्या 9 व्या वर्षी १९०६ मध्ये भायखळ्याच्या बाजारपेठेत डॉ. बाबासाहेबांशी लग्न झाले होते. रमाबाई बाबासाहेबांना आपुलकीने 'साहेब' म्हणायच्या तर बाबासाहेब आपुलकीने त्यांना 'रामू' म्हणत. कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व आपल्या पत्निमधे मिळणे हे बाबासाहेबांचे भाग्यच.
रमाईंचे संपूर्ण जीवन हे संघर्षात गेले. बाबासाहेब परदेशी असताना रमाईना अनेक अडचणींचां सामना करावा लागला.कमीत कमी खर्चात घर चालावं यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत बचत करून घर चालवायच्या.
ज्या वेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस रात्र एक करून लढत होते. त्या वेळी रमाई अतंत्य कष्टाने कोणतीही तक्रार न करता आणि आपल्या पतीपर्यंत त्यांच्या अडचणींची, दुःखाची कसलीच झळ पोहचु न देता आपल्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन देत असे.
रमाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, सत्याग्रह असो वा आंदोलनं रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय आणि सुधारणांसाठीच्या प्रयत्नांना ही पाठबळ दिलं आणि त्यांनी आपलं कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारणी होण्याचं व्रत रमाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. त्यांच्यातील प्रेम, आदर आणि सामंजस्य म्हणजे आदर्शच.
*दिक्षा साळवे*

