बौद्ध व इतर समाजातील सफाई कामगारांच्या वारसा हक्क विरोधात केलेला अन्यायकारक कायदा रद्द करा- अतिशभाई खराटे
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत समित्या सर्वच शासकीय, निमशासकीय आस्थापनात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या बौद्ध व इतर समाजातील कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि त्यांच्या वारसांना वारसा हक्काने मिळणाऱ्या नोकर भरतीस महाराष्ट्र शासनाने दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी काढलेल्या जीआर नुसार स्थगिती दिली आहे व मेहतर, वाल्मिकी व भंगी जातीच्याच वारसांना याद्वारे वारस हक्काने नोकर भरतीस सूट दिली आहे, या निर्णयामुळे बौद्ध व इतर समाजातील कामगारावर अन्याय होत आहे
याबाबतीत बौद्ध व इतर समाजातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांना निवेदन करण्यात आले आहे
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे बौद्ध व इतर समाजाच्या स्वच्छता कामगारा मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे तसेच फक्त वर नमूद केलेल्या तिन जातीसाठीच वारसा हक्काने त्यांच्या वारसांना नोकरी देऊन स्वच्छता कामगारांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करीत असून बौद्ध व इतर समाजाच्या कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सरकार करीत आहे ,महानगरपालिका, नगरपालिका सर्व शासकीय, निमशासकीय सेवेत काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या वारसांना सरसकट वारसा हक्काने नोकरी देण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारने हा चुकीचा व अन्यायकारक गैर कायदा रद्द करावा असे मत अतिशभाई खराटे यांनी व्यक्त केले आहे
त्या अनुषंगाने हा अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडावे व न्याय मिळवून द्यावा या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची बौद्ध व इतर समाजातील सफाई कर्मचारी भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.
