मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला भेट दिली. भारत व्यापार वृद्धी संस्था (आयटीपीओ) आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालन उभारले आहे. या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा विस्तार दाखवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दालनातील महाराष्ट्र राज्य हस्तकला आणि हातमाग महामंडळ, विविध स्वयंसहाय्यता गट, मराठी भाषा दालन, पैठणी कारागीर तसेच इतर स्टॉल्सची पाहणी केली. पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, घरसजावटीच्या वस्तू, हँड पेंटिंग, ऑर्गॅनिक उत्पादने, काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, खादी आणि बांबूच्या वस्तू तसेच बचतगटातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ अशा विविध उत्पादनांचे प्रदर्शन करणाऱ्या स्टॉल्सना त्यांनी भेट दिली. त्यांनी स्टॉलधारकांशी संवाद साधून उत्पादनांची माहितीही घेतली.
